मराठी कविता
मन आनंदी,मन स्वानंदी,मन मंदिरात साऱ्या ऋतूंची मांदियाळी,
गीत,भजन,अभंग,ओवी अन रंगते भूपाळी ..... ।।
रुणझुण वाजती पैंजण,बोल बोबडे,लीला अपार,
गाल गुलाबी,चिमुकले नाक,ओल्या पाकळ्यांचा तो स्पर्श,
त्या मिठीत ऊब जशी हिवाळी दुपार,
तिरीप सोनेरी चकाके कोवळी,
मन मंदिरात साऱ्या ऋतूंची मांदियाळी .... ।।
पानांची सळसळ,ओढ्याची खळखळ अन पक्ष्यांची फडफड,
चिवचिवाट खारुताईचा,शर्यत धावण्याची,उंबराचा रंग लाल,
अलगद निळ्या-काळ्या नक्षीदार फुलपाखरांची वरचढ,
हृदयाच्या कोपऱ्यात स्पंदने आगळी,
मन मंदिरात साऱ्या ऋतूंची मांदियाळी .... ।।
नागमोडी वळणावरील,लालचुटुक बहर गुलमोहराचा,
आसमंताला वेडावणारा सुगंध मोगऱ्याचा,
पिवळ्या रानफुलांचा, भरजरी काठ शोभे किनारीचा,
प्रभातीचा सडा केशरी,उजळी रांगोळी,
मन मंदिरात साऱ्या ऋतूंची मांदियाळी .... ।।
सागराच्या लहरी रेशमी,रेशमी लहेका नादाचा,
हेलकाव्याचा झोका मखमली,तुषारीत वाऱ्याचा,
गुपित सांगून जाती,परत फिरती, आनंद सूर मारण्याचा,
थरथरत्या पापण्यांवरती मोती काचेरी ओघळी,
मन मंदिरात साऱ्या ऋतूंची मांदियाळी .... ।।
हितगुज चंद्रासह,कुजबुज ही चांदण्यांची चालती,
डोकावून गेला धूमकेतू,सप्तऋषीं भोवती,
चांदीचा बेगड पसरला, त्या रानमाळावरती,
सप्तसुरांचा इंद्रधनुष्य, धवल क्षितिजावर मावळी,
मन मंदिरात साऱ्या ऋतूंची मांदियाळी .... ।।
अविकल्प ...
No comments:
Post a Comment